शहरातलं गाव : श्रमिकांच्या जिव्हाळ्याची बिबवेवाडी
ण्याच्या दक्षिण विकासाचा वेध घेताना बिबवेवाडी या महत्त्वपूर्ण भागाचा विचार प्रस्तुत लेखात करणार आहे.
लोकसत्ता टीम |आनंद सराफ |Published on: February 22, 2018 1:58 am
शहरविकासाबरोबर शहराचा परीघ मोठा होत राहणे, आसपासची गावे, शहरात समाविष्ट होणे, या प्रक्रियेत शहरी सोयीसुविधा मिळताना गावपण हरवणे हे ओघाने येते. पुण्यनगरीचा विचार करताना मूळचे नदीकाठचे पुणे, शिवकाळ, पेशवाई, इंग्रजी अंमल आणि स्वातंत्र्यानंतर महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र असा सर्व विचार करावा लागतो. चहूबाजूने पुणे विस्तारत असताना दक्षिणेचा विकास लक्षात घेता पेशवाई काळात अकरा मारुती मंदिरापर्यंत वस्तीचे दाखले मिळतात. त्या पुढे सर्व खडकाळ भागात पेशव्यांचा तोफखाना होता. इंग्रजी अमदानीत तिथे जेल, बंदीखाना निर्माण करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात आता तिथे मामलेदार कचेरी आहे. दक्षिणेचा विस्तार नंतर स्वारगेटचे पुढे बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज, नऱ्हे, आंबेगावपर्यंत पोचला आहे. पुण्याच्या दक्षिण विकासाचा वेध घेताना बिबवेवाडी या महत्त्वपूर्ण भागाचा विचार प्रस्तुत लेखात करणार आहे.
सातारा रस्त्याने, स्वारगेटचे पुढे गेल्यावर डाव्या हाताची बाजू थेट शंकर महाराज मठ पिछाडीपर्यंत बिबवेवाडी परिसराची विस्तारित हद्द मानली जाते. के. के. मार्केटवरून पुन्हा मार्केट यार्डकडे वळल्यास सर्व अंतर्गत भाग हा बिबवेवाडी परिसर समजला जातो. बऱ्याच ठिकाणी स्वारगेटच्या पुढे डाव्या बाजूला असलेल्या डोंगररांगा ही नैसर्गिक हद्द मानली जाते. अपर इंदिरानगरमध्ये असलेला पीएमटी डेपो ही बिबवेवाडीची अंतिम सीमारेषा आहे. शहराच्या या परिसराचे थोडक्यात वैशिष्टय़ सांगायचे झाले तर गावठाणातील मूळचे गावकरी अल्पसंख्य ठरून निम्म्यापेक्षा अधिक वस्ती ही कष्टकरी आणि हातावरचे पोट असणाऱ्या मंडळींची झाली आहे. मार्केड यार्डमुळे या परिसराकडे सधन व्यापारी मंडळींचे बंगले, सोसायटय़ा तयार झाल्या. पूर्वी जमिनी स्वस्त उपलब्ध झाल्याने बांधकाम व्यावसायिकांचे आकर्षण वाढून उच्चभ्रू मध्यमवर्गीय या परिसरात स्थायी झाले. विश्वकर्मा इन्स्टिटय़ूटच्या शैक्षणिक संकुलामुळे या परिसराची नवी ओळख सर्वासमोर झाली. येथील अनेक जमिनींवर शासकीय आरक्षणे आल्याने शहरांवर ताण देणाऱ्या अनेक उपेक्षित वस्त्या सुलभतेने या जमिनींवर स्थलांतरित झाल्या.
गावाच्या इतिहासाची पाने उलटताना अरण्येश्वर आणि पद्मावती मंदिराचा उल्लेख आवश्यक ठरतो. पद्मावती हे बिबवेवाडीचे ग्रामदैवत. गावगाडा सुरळीत चालण्यासाठी काही समाजांच्या वस्त्यांसाठी गावपरिसरात जमिनी राखण्याची पद्धत अनेक राजवटींनी जोपासली होती. गायराने आणि देवराईंप्रमाणेच या राखलेल्या जमिनींना मुजेरी असे संबोधले जात असे. कालांतराने अपभ्रंश होऊन पद्मावती परिसरातील अशा वस्त्यांना मुंजेरी हे बोली भाषेतून नाव मिळाले. या वस्त्या पुढे बिबवेवाडीतच गणल्या जाऊ लागल्या. परकीय आक्रमकांच्या जाचामुळे तुळजापूरवरून काही कदम मंडळी पुण्यातील कसबा पेठेत स्थलांतरित होऊन त्यांनी चौगुले नाव स्वीकारले. यांचेपैकी अनेक जण सध्याच्या बिबवेवाडी गावठाण परिसरात स्थिरावले. सातशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात इकडे डोंगररांगा आणि ओढय़ालगत वड आणि बिब्बे यांची मोठी वृक्षराजी होती. त्यावरूनच येथील रहिवाशांनी बिबवे असे नाव स्वीकारले. अर्थातच पारावरच्या गप्पातून बुजुर्ग मंडळींकडून मिळालेली ही माहिती आहे. अगदी १९५० पर्यंत अरण्येश्वर पद्मावतीचा परिसर केवळ निसर्गरम्य नव्हे तर निर्मनुष्य देखील होता. पर्वतीच्या पायथ्याशी वसलेल्या छोटय़ा वाडीतून एक वाट, धनकवडी कात्रजकडे जात असे. दुतर्फा झाडीतून जाणारी ही वाट आंबील ओढय़ाच्या काठाने जात असल्याने देवदर्शन आणि वनविहाराचे आकर्षण असलेल्या अनेक पुणेकरांचे हा परिसर म्हणजे अगदी १९८० पर्यंत सहलींचे ठिकाण होते.
बिबवेवाडी गावठाण भागातील भ्रमंतीमध्ये ऐंशीच्या आसपास वय असलेल्या अनेक मंडळींनी सांगितले, की साधारण शंभर वर्षांपूर्वी गाव दीडशे उंबऱ्याचे होते. गाव गाडय़ासाठी इथेपण बारा बलुतेदारांची वस्ती होती. बिबवे, बाबर, पापळ, गोडसे, बढे, देवकर, पोकळे, झांबरे, गव्हाणे, थोपटे, मराठे, शेळके, शेलार, जागडे, जाधव, बुचुडे, केंजळे, वैराट आणि पायगुडे अशी घराणी इथे राहत होती. पद्मावती हे ग्रामदैवत असून, गावठाणातील मारुती मंदिर, दत्त मंदिर, लोअर इंदिरानगर येथील शनिमारुती, गंगाधाम येथील खंडोबा, राजस्थानी मंडळींचे आईमाता मंदिर अशी श्रद्धास्थाने या परिसरात आहेत. हमरस्त्यावरील शंकर महाराज मठ येथेही भाविकांची वर्दळ असते.
वस्ती विकासाबरोबर उभ्या राहिलेल्या सुरुवातीच्या काळातील सोसायटी, वस्त्या यांचा उल्लेख इथे आवश्यक ठरतो. पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर लगेचच १९५२ साली बिबवेवाडी गाव, पालिकेत समाविष्ट झाले. आदिनाथ, प्रेमनगर, वसंतबाग, कोठारी ब्लॉक्स, रम्यनगरी, चिंतामणीनगर, संत एकनाथनगर, तोडकर, मॅजेस्टिक, लेकटाउन, कोणार्क गार्डन, अपर-लोअर इंदिरानगर, सुखसागरनगर, राजीव गांधीनगर, आंबेडकरनगर, १७६ ओटा स्कीम, स्टेट बँक नगर, गुरुराज सोसायटी, जेधेनगर, गणेश पार्क.. या आणि अशा अनेक सोसायटी/ वस्त्यांनी बिबवेवाडी परिसर बहरलेला आहे. राव, विघ्नहर्ता, सह्य़ाद्री, भगली, पारसनीस, कोठारी, वैद्य.. अशी हॉस्पिटल्स परिसराच्या वैद्यकीय सेवेची गरज पूर्ण करीत आहेत.
गावे शहरात समाविष्ट झाली, तरी गावपण हरवू नये, असे अनेकांना वाटते. त्यातूनच स्मरणरंजन, हुरहूर, खंत प्रकट होत असते. पिढय़ा बदलत गेल्या तरी सुखसोईंमध्ये रमलेल्या अनेकांची हीच भावना आहे, असे गावगप्पांमधून लक्षात आले. मंदिरातून येणारे गाण्या-बजावण्याचे सूर आणि टाळ-मृदंगाचा नाद पूर्वी घराघरात पोहोचत होता. मन प्रसन्न करत होता, असे नाना शेळके यांनी सांगितले. बारा बलुतेदारांच्या गावगाडय़ात सर्व जण एकोप्याने नांदत होते, असे ते म्हणाले. पुणे शहराचा कचरा डेपो १९७४-७५ पर्यंत गावठाणाजवळच होता. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने या परिसरात माशांचा प्रचंड त्रास जाणवत असे. त्याची तीव्रता एवढी मोठी होती, की या भागांतील होतकरू मुलांना लग्नासाठी थेट नकार मिळत असे, अशी आठवण सर्जेराव बिबवे यांनी सांगितली.
पंचाहत्तरीच्या सरुबाई बिबवे सांगत होत्या, या भागात ज्वारी आणि कडधान्याची शेती भरपूर होती. त्या स्वत: खुरपणीची कामे करायच्या. उरसाला पुरणपोळ्यांची रेलचेल असायची. तमाशापासून महिला मंडळी मात्र दूर असायची. मंगल बिबवे म्हणाल्या, की कात्रज उच्छवासाचे एकच ठिकाण आणि नंतरही एकच नळकोंडाळे गावाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवत होते. पुण्यात आर्यन, प्रभातला लागणारे मराठी पिक्चर पाहण्यासाठी गावकरी मंडळी सजवलेल्या बैलगाडय़ातून जात असत. शेतमजूर महिला थेट कात्रजपर्यंत पायपीट करून चारा गोळा करून पुण्यात विकायला नेत असत.
परिसराच्या विकासाची कारणे माहिती करून घेताना १९७७ च्या सुमारास उभे राहिलेल्या मार्केट यार्डचा उल्लेख महत्त्वाचा आहे. शासनाने आरक्षित केलेल्या या भागातील अनेक जमिनींवर जे प्रकल्प उभे राहिले त्यापैकी हा एक! महात्मा फुले मंडईतील जागा अपुरी पडल्यावर या भागात आशिया खंडातील भव्य दिव्य प्रकल्प उभा राहिला. व्यापारी, आडते, मजूर मंडळींच्या वस्त्या याच अनुषंगाने उभ्या राहिल्या. पानशेत पुरानंतर पर्वती पायथा, दांडेकर पूल, गणेशमळा या परिसरातील दाट लोकवस्त्या स्थलांतरित करण्याकडे लक्ष वेधले ते शंतनूराव किलरेस्कर आणि मोहन धारिया यांनी अशी माहिती मिळाली. अपर-लोअर इंदिरानगर तसेच ओटा स्कीम याच प्रयत्नातून उभ्या राहिल्या. तुलनात्मक स्वस्त जमिनी उपलब्ध झाल्याने बांधकाम व्यावसायिकांचे आकर्षण वाढले. व्यापारी आणि धार्मिक वृत्तीच्या मंडळींना हा परिसर सुरक्षित आणि शहरानजीकच असल्याने वाहतूकसुलभ वाटला. नगर नियोजनानुसार वस्ती विकास होताना मनपातर्फे रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज या सुविधा सर्वानाच उपलब्ध झाल्या. विश्वकर्मा शिक्षण समूहाबरोबर वीस खासगी शिक्षण संस्था आणि पुणे मनपाच्या बारा शाळा असल्याची माहिती मिळाली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असल्याने विकासाचा समतोलही राखला जातोय, असे सर्वसाधारण चित्र आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य रस्ते आणि फ्लायओव्हर ब्रीज इथे झाले आहेत. स्वाभाविकच सुलभ वाहतुकीने व्यापार आणि वस्त्या बहरत आहेत.
आधुनिकतेचे वारे वाहत असले तरी गावपण जपणारे उत्सव या गावानेही जपले आहेत. पद्मावती देवीचा उरुस, हनुमान जयंतीनंतर लगेचच साजरा होतो. जत्रा, ढोल ताशांचे खेळ, छबीना, तमाशा, बारागावच्या कुस्त्या, पुरणपोळीचा नैवेद्य असे सर्व काही आजही होते. गावातील मंदिरात नित्यपूजेबरोबर प्रासंगिक काकड आरती, हरिनाम स्ताह देखील साजरे होतात. एक गाव, एक गणपती ही बिबवेवाडी गावठाणाची अभिमानास्पद परंपरा आहे. या परिसरातील नामवंत रहिवाशांचा उल्लेख करताना शिल्पकार कै. बी. आर. खेडकर, बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, शिक्षणतज्ज्ञ शं. ना. नवलगुंदकर, शांता शेळके, सूर्यकांत कोठारी, जयसिंग जेधे, बबनराव बिबवे, आबासाहेब शिंदे, पोपटशेठ ओस्तवाल, कै. मधुकर बिबवे अशी अनेक नावे सर्वाच्याच चर्चेत आली. नानासाहेब धर्माधिकारी यांचा मोठा शिष्य परिवार या भागात आहे. बचतगटांचे मोठे जाळे या परिसरात असून स्वयंरोजगाराबरोबर शासकीय विकास योजना त्यांचे माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. स्वामी विवेकानंद पुतळा आणि अण्णा भाऊ साठे सभागृह या परिसराची नवी शान ठरली आहेत. या साऱ्या माहितीसाठी आणि संदर्भासाठी सुनील बिबवे, चंद्रकांत अमराळे, माला रणधीर, गजानन अंबाडे, अपर्णा मोरे, नितीन बिबवे, प्रा.सचिन बिबवे, इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे, डॉ. अविनाश सोवनी यांचे सहकार्य झाले. त्यांचाही उल्लेख करायला हवा.